नवी दिल्ली - भारताच्या विश्वकरंडक विजेत्या हॉकी संघातील माजी खेळाडू अशोक दिवाण हे अमेरिकेत अडकले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून भारतात परतण्यासाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी केली होती. क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी दिवाण यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
गुरुवारी संध्याकाळी रिजीजू यांच्या कार्यालयाने सांगितले, की सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाने अशोक यांच्याशी संपर्क साधला आहे आणि ते त्यांच्यासाठी डॉक्टर पाठवित आहेत. रिजीजू यांच्या कार्यालयाने लिहिले "हॉकी ऑलिम्पियन अशोक दिवाण अमेरिकेत अडकलेले आहे आणि त्यांची तब्येत ठीक वाटत नाही. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाने त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि डॉक्टरांकडे पाठवले हे. जेणेकरून त्यांना त्वरित वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल. "
अशोक दिवाण हे भारताने १९७५मध्ये जिंकलेल्या विश्वकरंडक हॉकी संघातील माजी खेळाडू आहेत. तसेच त्यांनी १९७६च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दिवाण यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ते लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकले आहेत. त्यात त्यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांनी आयओए अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्याशी संपर्क साधला आणि भारतात परण्यासाठी मदत मागितली होती.