नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या प्रवासी कामगारांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाने ‘फिटनेस चॅलेंज’ सुरू केले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे.
महिला हॉकीपटूंनी या लॉकडाऊनदरम्यान किमान १००० कुटूंबांना आहार मिळावा या उद्देशाने लोकसहभागातून मदत निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी लोकांना सक्रिय जीवनशैली अवलंबण्यास प्रोत्साहित केले जाईल. हॉकी इंडियाकडून भारतीय कर्णधार राणी रामपाल म्हणाली, “दररोज आम्ही वर्तमानपत्रांत आणि सोशल मीडियामध्ये वाचत असतो की बरेच लोक अन्नासाठी संघर्ष करत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
“आम्हाला वाटले की ऑनलाइन फिटनेस चॅलेंज यासाठी सर्वोत्तम मार्ग असेल. यासह आम्ही लॉकडाऊन दरम्यान लोकांना सक्रिय राहण्याचे आवाहन करू शकतो. या उपक्रमातून कमीतकमी हजार कुटुंबांच्या अन्नासाठी पुरेसा निधी उभारण्याचे आमचे लक्ष्य आहे”, असेही राणी म्हणाली आहे.
लोकसहभागातून मिळालेला पैसा उदय फाउंडेशन या दिल्लीतील स्वयंसेवी संस्थेला (एनजीओ) देण्यात येणार आहे. याचा उपयोग विविध ठिकाणी राहणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या आजारी लोकांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी केला जाईल. या निधीअंतर्गत अन्न व रेशन देण्याव्यतिरिक्त लोकांना स्वच्छतेसाठी सॅनिटायझर, साबण यासारख्या आवश्यक वस्तूही दिल्या जातील.
या चॅलेंजचा एक भाग म्हणून, महिला संघातील खेळाडू बर्पी, लंजेस, स्क्वॅट्स टू स्पायडर-मॅन पुशअप्स आणि पोगो हॉप्स अशा व्यायामासह सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फिटनेस (वर्कआउट) चॅलेंज देताना दिसतील. दररोज खेळाडू नवीन चॅलेंज देतील आणि 10 लोकांना टॅग करतील. शिवाय, १०० रुपये देण्याची विनंतीही करतील.