नवी दिल्ली - भारतीय पुरुष हॉकी संघ पुढच्या वर्षी एफआयएच प्रो लीगमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेला प्रारंभ करेल. अर्जेंटिनाविरुद्ध 10 आणि 11 एप्रिल रोजी भारत सामना खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) गुरुवारी पुरुष व महिला प्रो लीगसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले.
अर्जेंटिनाशी खेळल्यानंतर भारतीय संघ 8 आणि 9 मे रोजी ग्रेट ब्रिटनशी तर 12 आणि 13 मे रोजी स्पेनशी सामना करेल. भारतीय खेळाडू हे दोन्ही सामने घराबाहेर खेळणार आहेत. त्यानंतर ते 18 आणि 19 मे रोजी जर्मनी दौर्यावर असतील. या दौऱ्यानंतर ते मायदेशी परततील आणि 29 आणि 30 मेला न्यूझीलंडविरूद्ध खेळतील.
जुन्या वेळापत्रकानुसार, भारत 14 जून रोजी स्पेनमध्ये आपल्या मोहिमेची सांगता करणार होता. नव्या वेळापत्रकानुसार प्रो लीगच्या पहिल्या सामन्यात 22 आणि 23 सप्टेंबर रोजी जर्मनी बेल्जियमविरूद्ध खेळेल.