नवी दिल्ली - हॉकी इंडिया बंगळुरुमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे असलेल्या खेळाडूंसाठी प्राथमिक कोचिंग कोर्स सुरू करणार आहे. यामध्ये वरिष्ठ पुरुष संघातील 32 खेळाडू आणि वरिष्ठ महिला संघातील 23 खेळाडू सहभागी होणार आहेत. हा कोर्स ऑनलाईन घेण्यात येईल.
हा कोर्स हा 2019 मध्ये सुरू झालेल्या एचआयच्या कोचिंग एज्युकेशन पाथवे कार्यक्रमाचा एक भाग आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार राणीने यापूर्वीच लेवल क्रमांक 1चे प्रमाणपत्र मिळवले आहे. या खेळाडूंना 36 तासांच्या ऑनलाइन सत्रात भाग घ्यावा लागेल. त्यानंतर ऑनलाइन परीक्षादेखील द्यावी लागेल.
पुरुष खेळाडूंसाठी ही परीक्षा 11 मे तर, महिला खेळाडूंसाठी 15 मेला घेण्यात येणार आहे. यासंदर्भात एचआयचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले, "एचआय मध्ये आम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की या कठीण काळातही आपण आपली धोरणे अडथळा न येता चालू ठेवू शकतो. तसेच दररोजचे कामकाजही चालू ठेऊ शकतो. या क्षणी आमचा संघ बंगळुरूच्या केंद्रामध्ये आहे. त्यामुळे त्यांना कोचिंगबद्दल माहिती देण्याची चांगली संधी असेल असे आम्हाला वाटते."