मुंबई - देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च राजीव गांधी 'खेलरत्न' पुरस्कारासाठी भारतीय हॉकी संघाने गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि माजी महिला खेळाडू दीपिका यांची शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांची नाव पाठवण्यात आली आहेत.
श्रीजेशला २०१५ मध्ये अर्जुन आणि २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. दीपिका २०१८ सालच्या अशियाई क्रीडा आणि २०१८ सालच्या अशियाई चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या सिल्वर मेडल विजेत्या भारतीय संघाची सदस्य आहे. हरमनप्रीतने भारतासाठी १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहेत. तर वंदना कटारिया हिने २०० हून अधिक तर नवज्योतने १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.
प्रशिक्षक बी जे करियप्पा आणि सी आर कुमार यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय माजी भारतीय खेळाडू आरपी सिंग आणि संगई इबेमहल यांची मेजर ध्यानचंद आजीवन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाची समिती विजेत्यांची नावे निवडणार आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबन यांनी सांगितलं की, मागील वर्षी राणी रामपालला खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. ही बाब आमच्यासाठी गौरवाची होती. यावेळी आम्ही देशाचे दोन महत्वाचे हॉकी खेळाडू पी आर श्रीजेश आणि दीपिकाचे नाव पाठवलं आहे.
दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला १९९१ मध्ये सुरूवात करण्यात आली. या पुरस्कार विजेत्या खेळाडूस २५ लाख रुपये देण्यात येतात.
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक कोठे होणार?; BCCI सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट
हेही वाचा - बजरंग पूनिया वेदनेने विव्हळला, Tokyo Olympics आधी भारताला जबर धक्का