फारो (पोर्तुगाल) - विश्व कप पात्रता फेरीच्या ग्रुप ए मध्ये बुधवारी पोर्तुगालने आयर्लंडवर 2-1 ने विजय मिळवला. पोर्तुगालच्या विजयात स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मोलाची भूमिका निभावली. त्याने दोन गोल डागत पोर्तुगालला विजय मिळवून दिला. या कामगिरीसह त्याने पुरूष आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
आयर्लंडने सामन्याच्या 45व्या मिनिटाला गोल करत 1-0 ने आघाडी घेतली. जॉन इगान याने हा गोल केला. तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डोने 89व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधून दिली. रोनाल्डोचा हा 110वा गोल ठरला. त्याने इराणचा माजी स्ट्रायकर अली देई याचा सर्वाधिक गोलचा विक्रम मोडित काढला. रोनाल्डोने दुखापतीतून सावरल्यानंतर 180 सामन्यात 111 गोल केले आहेत. त्याने पुढील मिनिटात आणखी एक गोल करत पोर्तुगालचा विजय निश्चित केला.
सामना संपल्यानंतर बोलताना ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला, मी रेकॉर्ड मोडला म्हणून खूश नाही तर आम्हाला मिळालेल्या खास क्षणासाठी देखील मी खूश आहे. अंतिम काही क्षणात दोन करणे खूप कठीण असते. पण आमच्या संघाने ते करून दाखवलं. यासाठी मी त्यांचे कौतुक करतो. आम्ही अखेरपर्यंत आपल्यावरील विश्वास कमी होऊ दिला नाही.
आयर्लंडविरुद्धच्या विजयानतर पोर्तुगाल चार सामन्यामध्ये 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. सर्बियाचा संघ त्याच्यापेक्षा तीन गुणांनी मागे आहे.
हेही वाचा - विराट कोहलीची क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण, कशी ठरते रॅकिंग?, जाणून घ्या
हेही वाचा - ENG vs IND: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया