थायलंड - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने भारताकडून सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम रचताना त्याने भारताचा माजी कर्णधार बायचुंग भूतियाला पछाडले आहे. छेत्रीने एकूण १०८ सामने खेळले असून भूतियाच्या नावावर १०७ सामने खेळण्याचा विक्रम होता.
किंग्स फुटबॉल कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात छेत्रीने हा विक्रम आपल्या नावे केला. भारतीय फूटबॉल संघाचा पहिला सामना कुरसावो या संघाविरुद्ध होता. या सामन्यात भारताला कुरसावोच्या संघाकडून ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतासाठी सुनील छेत्रीने एकमेव गोल करत आपला ६८ वा आंतरराष्ट्रीय गोल दागला. आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये भारताकडून सर्वाधिक गोल झळकावण्याचा मान हा छेत्रीकडेच आहे.
किंग्स फुटबॉल कप स्पर्धेतील सर्व सामने बुरीराम येथील चांग एरेना फुटबॉल मैदानावर खेळले जाणार असून या स्पर्धेत भारतासह यजमान थायलंड, व्हिएतनाम आणि कुरसावोचे संघ सहभागी झाले आहेत.