कोलकाता - कोलकाता येथील फुटबॉल क्लब मोहन बागानने कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालयांना मदत करण्यासाठी हा क्लब पश्चिम बंगाल आपत्ती निवारणासाठी निधी देईल.
‘सर्वांसाठी ही कठीण वेळ आहे आणि अशा काळात कोणीही मागे राहू नये. आमचे योगदान फक्त एक सुरुवात आहे. आम्हाला आशा आहे की आणखी लोक गरजू कुटुंबांनाही सामील होतील आणि मदत करतील. एकत्र येऊन आपण या संकटावर विजय मिळवू शकतो’, असे मोहन बागान सरचिटणीस श्रींजॉय बोस यांनी क्लबच्या संकेतस्थळावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोहन बागान क्लबने आय-लीगचे विजेतेपद जिंकले आहे. कोलकातामधील आर्यन क्लबनेही राज्याच्या मदत निधीला दोन लाख रुपये दिले आहेत.