तूरिन - कोरोना व्हायरसमुळे मागील दोन महिन्यांपासून पोर्तुगालमध्ये लागू केलेल्या लॉकडाऊननंतर इटालियन क्लब जुव्हेंटस आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो इटलीत दाखल झाला आहे. इटालियन माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रोनाल्डो रात्री उशिरा पोर्तुगालच्या माडेयरा येथून खासगी विमानातून इटलीला पोहोचला. येथे पोहोचल्यानंतर आता तो दोन आठवड्यांसाठी एकांतवासात असेल.
सेरी-ए क्लब जुव्हेंटस संघातील खेळाडूंनी सोमवारी वैयक्तिक पातळीवर प्रशिक्षण सुरू केले. जुव्हेंटसने आपल्या सर्व दहा परदेशी खेळाडूंना बोलावले आहे. 27 मे ते 2 जून दरम्यान सेरी-एचे सामने खेळवण्यात येऊ शकतात. परंतू, औपचारिक तारखा जाहीर होणे बाकी आहे.
कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे सेरी-ए लीग 9 मार्च पासून पुढे ढकलण्यात आली आहे. जुव्हेंटसचा संघ सध्या लीग गटात अव्वल आहे. या लीगमध्ये प्रत्येक संघाला 12 सामने खेळायचे आहेत.