कोलकाता - २००५-०६ मध्ये जोसे रामीरेज बारेटो आणि युसिफ याकुबु यांच्यासह महिंद्रा युनायटेडसाठी राष्ट्रीय फुटबॉल लीगचे विजेतेपद मिळवणारा माजी भारतीय फॉरवर्ड सुरोजित बोस सध्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. आय-लीग सुरू होण्यापूर्वी महिंद्रा युनायटेडच्या विजेतेपदासाठी ब्राझीलच्या बारेटो आणि घानाच्या याकुबु यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
३३ वर्षीय सुरोजित सध्या दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुरोजित कोलकातामधील मोहन बागान आणि मोहम्मदन स्पोर्टिंग क्लबकडून खेळला आहेत. २०१४ मध्ये त्याने आय-लीगमध्ये इंडिया एफसीकडून शेवटचा सामना खेळला होता.
सुरोजितने एका वृत्तसंस्थेला सांगितले, "मला पहिल्या टप्प्यात रक्ताचा कर्करोग, अॅक्क्युट मायलोईड ल्युकेमियाचे (एएमएल) निदान झाले आहे. मला ७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माझी तब्येत बरी आहे. पण दिल्लीत आल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. मला माझ्या पूर्वीच्या सहकाऱ्यांकडून मदत लाभली. "
पश्चिम बंगालमधील कल्याणी जिल्ह्यातील रहिवासी असलेला सुरोजित हा पुण्यातील फुटबॉल विकास केंद्रात प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. तिथेच तो आजारी पडला. मोहन बागान क्लबसोबत फेडरेशन चषक जिंकणारा सुरोजित म्हणाला, "मला तीव्र ताप आला आहे आणि मला योग्यरित्या प्रातःविधी करणे शक्य नव्हते. तरीही मी काही कामानिमित्त दिल्लीला आलो आणि ६ ऑगस्टला माझी तब्येत बिघडली. मी येथे एकटाच होतो. माझे काही विद्यार्थी होते, ज्यांनी मला माझ्या कुटुंबाशी संपर्क साधण्यास मदत केली आणि मला दवाखान्यात आणले. मग मी अभिजित कुमार या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी माझी काळजी घेतली.''
ते म्हणाले, "तीन महिन्यांपासून मला पुण्यातही पगार मिळालेला नाही. या कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. खरं तर आज मी जे बोलत आहे, त्यापाठी माझे विद्यार्थी आणि डॉ अभिजीत कुमार आहेत.''