झारखंड - संतोष ट्रॉफी स्पर्धेचे माजी फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक अभिजीत गांगुली यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. बिरसा मुंडा स्टेडियमवर मुलं आणि मुलींना प्रशिक्षण देत असतानाच ही दुदैवी घटना घडली. अभिजीत गांगुली हे धनबाद रेल्वे विभागाचे प्रशिक्षक होते.
हेही वाचा - जाणून घ्या, 'हिटमॅन' शर्माने द्विशतकासह केलेले 'हे' मोठे विक्रम
गांगुली हे रोजच्या प्रमाणेच सकाळी बिरसा मुंडा स्टेडियमवर प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. त्यावेळी पाऊसही सुरू होता. भर पावसातही ते मुलांना प्रशिक्षण देत होते. तेव्हा एक वीज कडाडली आणि ती मैदानात कोसळली. त्यात गांगुली यांच्यासह काही खेळाडू सापडले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय फुटबॉलपटू लाल हेम्ब्राम आणि चंदन हे खेळाडूही होते मात्र त्यातून ते बचावले.
या घटनेनंतर, गांगुली यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि आई आहे. १९९३ मध्ये गांगुलीनी संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत बिहारचे प्रतिनिधित्व केले होते. फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी झारखंडमध्ये चांगले फुटबॉलपटू निर्माण केले होते.