बार्सिलोना - फुटबॉल क्लब बार्सिलोना आणि एफसी रियल माद्रिदचे माजी खेळाडू जस्टो तेजादा यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले आहे. ६ जानेवारी १९३३ रोजी बार्सिलोना येथे जन्मलेल्या तेजादा यांनी १९५३ ते १९६१ या कालावधीत बार्सिलोनाच्या पहिल्या संघासाठी आठ हंगाम खेळले होते.
हेही वाचा - आनंदाची बातमी...टेनिसचा राजा करणार 'कमबॅक'
या कालावधीत तेजादा यांनी १९४ सामने खेळत ९२ गोल केले. क्लबकडून त्यांनी दोन लीग चॅम्पियनशिप, दोन कोपा डेल रे आणि दोन फेअर कप विजेतेपदे जिंकली. तेजादांच्या बार्सिलोना संघात कुबाला, अँटोइन रॅमलेट्स, इस्टनिस्ला बसोरा, अवेरिस्टो डी मॅसिडो आणि इलोगिओ मार्टिनेझ यांसारख्या महान खेळाडूंचा समावेश होता.
बार्सिलोनानंतर ते रियल माद्रिदसाठी (१९६१ ते १९६३) आणि एस्पेनयोलसाठी (१९६३ते १९६५) प्रत्येकी दोन हंगाम खेळले. रियल माद्रिदकडून खेळताना त्यांनी दोन ला-लीगा आणि एक कोपा डी एस्पेका किताब जिंकला होता. तेजादा हे २४ सप्टेंबर १९५७ रोजी कॅम्प नोऊ येथे पहिला सामना खेळणार्या फुटबॉलपटूंपैकी एक होते. स्टेडियमच्या इतिहासातील पहिला गोल करण्यासाठी त्यांनी युलिओ मार्टिनेझची मदत घेतली. तेजादा यांनी स्पेनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळले आहे.