पणजी - फुटबॉलपटू कार्लोस पेनाने गुरुवारी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. ३६ वर्षीय पेना आयएसएलमध्ये एफसी गोव्यासाठी खेळला होता. त्याने दोन हंगामात गोव्याचे प्रतिनिधित्व केले. शिवाय, इंडियन सुपर लीगचे (आयएसएल) जेतेपद जिंकून देण्यात पेनाचा मोठा वाटा होता.
मागील हंगामात, गोवा आयएसएलमध्ये प्रथम स्थानावर होता आणि यामुळेच हा संघ एएफसी चॅम्पियन्स लीगच्या गट फेरीत स्थान मिळवणारा भारतातील पहिला संघ ठरला होता. पेनाने गेल्या दोन मोसमात गोवाकडून ४३ सामने खेळले. तो संघाच्या बचाव फळीचा महत्त्वाचा भाग होता.
निवृत्तीनंतर पेना म्हणाला, "गेल्या दोन हंगामात भारत आणि गोवा संघात राहणे माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक होते. गोव्यातील लोकांचे प्रेम मिळाल्यामुळे मला आनंद झाला. आम्ही एकत्र बरेच काम केले आहे. दोन वर्षे भारतात राहण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी आणि माझे कुटुंब भाग्यवान आहोत. आम्ही नेहमीच गोव्याचे राहू. "