नवी दिल्ली - ब्राझीलचे सार्वकालीन महान फुटबॉलपटू पेले सध्या नैराश्याने ग्रस्त असल्याचे त्यांचा मुलगा इडिन्होने उघड केले आहे. आरोग्याविषयक तक्रारीमुळे ७९ वर्षीय पेले नैराश्याने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा -खुशखबर!..पदकविजेत्या खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पेले यांना मूत्राशयाच्या संसर्गामुळे रुग्णालयात १३ दिवस घालवावे लागले होते. नुकतीच त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली. त्यामुळे, त्यांना हालचाल करण्यासाठी फ्रेमची मदत घ्यावी लागते. इडिन्हो म्हणाले की, आजकाल त्याचे वडील नाखूष आहेत. त्याच्या चेहऱयावर निराशेची भावना आहे. राजासारखे जीवन जगणारे त्याचे वडील व्यवस्थित चालू शकत नाहीत. त्याला एक प्रकारे स्वत:ची लाज वाटते.
'पेले यांना बाहेर जायचे आहे, लोकांना भेटायचे आहे कारण त्यांनी आयुष्यभर हेच केले. पण आता सर्व काही बदलले आहे. ते आपल्या घरापासून फार दूर जाऊ शकत नाही. म्हणूनच ते नैराश्याला बळी पडले आहेत', असेही इडिन्हो म्हणाले आहेत.
आपल्या २१ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत, पेले यांनी १३६३ सामन्यात १२८१ गोल केले. ब्राझीलकडून त्यांनी ९१ सामन्यांत ७७ गोल केले आहेत.