रोम - 'वयाच्या २० व्या वर्षी मिळालेल्या ऑफरपेक्षा वयाच्या ३८ व्या वर्षी मला खूप ऑफर आल्या', असे इटलीतील प्रसिद्ध क्लब एसी मिलानबरोबर करार करणार्या झ्लाटान इब्राहिमोविचने सांगितले आहे. एसी मिलान मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत इब्राहिमोविच बोलत होता. फुटबॉलविश्वातील 'अतरंगी' खेळाडू म्हणून ओखळल्या जाणाऱ्या इब्राहिमोविचने काही दिवसांपूर्वीच एसी मिलानमध्ये पुनरागमन केले आहे.
हेही वाचा - निवृत्तीच्या बाबतीत मलिंगाने केले मोठे विधान, म्हणाला...
स्वीडनचा दिग्गज फुटबॉलपटू इब्राहिमोविच मिलानमध्ये विनामूल्य बदली म्हणजेच फ्री ट्रान्स्फरवर दाखल झाला. इब्राहिमोविचने असेही म्हटले आहे की, पहिल्यांदा त्याला हा संघ सोडायचा नव्हता. परंतु, कॉर्पोरेट निर्णय असल्याने तसे करण्यास भाग पडले होते.
इब्राहिमोविचने चालू हंगामाच्या शेवटी एसी मिलानशी करार केला. त्यात एक वर्षाच्या मुदतवाढीची तरतूदही आहे. एसी मिलानने या करारासाठी त्याला ३५ लाख युरो वेतन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. १९९९ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा इब्राहिमोविच मालमा, अजॅक्स, जुव्हेंटस, इंटर मिलान, बार्सिलोना, एसी मिलान, पीएसजी आणि मँचेस्टर युनायटेड यासारख्या क्लबकडून खेळला आहे. त्यानंतर २०१८ मध्ये तो मेजर लीग सॉकर खेळण्यासाठी अमेरिकेत गेला होता.