हरारे - पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी इंग्लंड संघातील तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर आता काही तासात झिम्बाब्वेमधून देखील बातमी आली आहे. झिम्बाब्वे संघातील सीन विलियम्स आणि क्रेग इर्विन या दोन खेळाडूंना बांग्लादेशविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. कारण ते दोघेही त्यांच्या कुटुंबियामध्ये कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आले होते. त्यांना सामन्यातून बाहेर करत क्वारंटाइन करण्यात आले आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, झिम्बाब्वे क्रिकेटचे मीडिया व्यवस्थापक डार्लिंगटन माजोंगा यांनी सांगितलं की, 'सीन विलियम्स आणि क्रेग इर्विन मागील आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या झिम्बाब्वेच्या २० सदस्यीय संघाचे भाग होते. पण ते आता संघासोबत जोडले जाऊ शकत नाही. त्यांच्या परिवारातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून ते त्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे त्यांना संघापासून वेगळे करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्रोटोकॉलनुसार, त्यांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल.'
झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रँडन टेलर याने सांगितलं की, विलियम्स आणि क्रेग यांच्या अनुपस्थितीत नव्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. आम्हाला काही अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवत आहे. पण आमच्याकडे चांगले युवा खेळाडू आहेत. त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे.
सलामीवीर फलंदाज ताकुदजवानशे कैतानो, वेगवान गोलंदाज तनाका चिवांगा, फलंदाज जॉयलॉर्ड गुंबी आणि डियोन मायर्स यांना प्रथमच झिम्बाब्वे संघात संधी मिळाली आहे. दरम्यान, आज सकाळी इंग्लंड संघातील ३ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. इंग्लंड संघ दोन दिवसात पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्याआधीच खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नव्या खेळाडूंना संधी देत आपला संघ जाहीर केला. इंग्लंडचे १८ पैकी ९ खेळाडू अनकॅप्ड आहेत.
हेही वाचा - ICC ODI Rankings: आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मितालीचे 'राज'
हेही वाचा - India Tour of Sri Lanka : धवन इलेव्हन विरुद्ध भुवनेश्वर इलेव्हन सराव सामना, कोणी मारली बाजी