साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये रंगला आहे. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू काळ्या फितीसह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे काल शुक्रवारी (१८ जून) निधन झाले. मिल्खा सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडू दंडावर काळ्या फितीसह मैदानात उतरले आहेत.
जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हा सामना साउथम्पटन येथील एजेस बाउल मैदानावर रंगला आहे. १८ जून रोजी या सामन्याला सुरूवात होणार होती. परंतु पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस रद्द करण्यात आला. आज साउथम्पटनमधील आभाळ स्वच्छ असून तिथे सूर्यप्रकाशही पडला आहे. यामुळे आजपासून सामन्याला सुरूवात झाली आहे.
मिल्खा सिंह यांच्याविषयी थोडक्यात...
मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. मिल्खा सिंह यांनी १९५८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. त्यानंतर त्यांनी १९६२ मधील जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळामध्ये ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा - 'फ्लाईग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन; क्रीडा विश्व हळहळले
हेही वाचा - IND vs NZ Test LIVE : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम फलंदाजी