हैदराबाद World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियानं 70 धावांनी धमाकेदार विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात विराट कोहलीनं त्याचं 50वं वनडे शतक झळकावलं. याशिवाय श्रेयस अय्यरनंही आक्रमक शतकी खेळी केली. मात्र सामन्यानंतर चर्चा सुरू आहे, ती केवळ एकाच खेळाडूची, तो म्हणजे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी!
शमीनं मोडलं न्यूझीलंडचं कंबरडं : न्यूझीलंडविरुद्ध शमीनं आपल्या धारदार गोलंदाजीनं किवी फलंदाजांचं अक्षरश: कंबरडं मोडलं. त्यानं 9.5 षटकात 57 धावा देत 7 बळी टिपले. मोहम्मद शमीचे कोच बदरूद्दीन सिद्दीकी यांनी त्याच्या या कामगिरीबाबत ‘ईटीव्ही भारत’शी खास बातचीत केलीय.
विश्वचषकात सगळीकडं गोलंदाजांची चर्चा : शमीच्या या कामगिरीनंतर त्याच्या मूळ गावी अत्यंत आनंदाचं वातावरण असल्याचं सिद्दीकी यांनी सांगितलं. “आपल्याकडं या आधी फक्त फलंदाजांच्या कामगिरीची चर्चा व्हायची. मात्र, या विश्वचषकात सगळीकडं गोलंदाजांची चर्चा आहे, असं ते म्हणाले. खास करून शमीच्या कामगिरीमुळं टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली, याचा जास्त आनंद आहे”, असं ते म्हणाले.
प्लेइंग 11 साठी पहिला चॉइस नव्हता : मोहम्मद शमीच्या नावे या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट आहेत. त्यानं केवळ 6 सामन्यात 9.13 च्या सरासरीनं 23 विकेट घेतल्या आहेत. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तो विश्वचषकाच्या सुरुवातीला प्लेइंग 11 साठी पहिला चॉइस नव्हता. ऑलराउंडर हार्दिक पांड्या चौथ्या सामन्यात दुखापतीमुळं बाहेर पडला होता. त्यानंतर शमीला टीम इंडियात संधी मिळाली. याबाबत बोलताना सिद्दीकी म्हणाले की, मला पूर्ण विश्वास होता की, शमीला टीममध्ये संधी मिळेल. “ही मोठी स्पर्धा आहे. तुम्ही सर्व गोलंदाजांना एकत्र खेळवू शकत नाही. संघाची परिस्थिती अशी होती की, शमीला सुरुवातीला संधी मिळाली नाही. मात्र, जेव्हा संधी मिळाली तेव्हा, त्यानं आपलं 100 टक्के दिलं. आता परिस्थिती अशी आहे की, त्याला टीममधून बाहेर काढण्याचा विचारही कोणी करू शकत नाही”, असं ते म्हणाले.
फायनलमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करावी : न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी ही शमीची त्याच्या आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम आहे. मात्र, शमीचे कोच बदरूद्दीन सिद्दीकी यांच्या मते शमीनं इथेच थांबू नये. “निश्चितच, ही शमीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती, मात्र त्यानं यापुढं याहूनही अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा. अजून फायनल बाकी आहे. शमीनं फायनलमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवावी, तसंच संघाला विजय मिळवून द्यावा, अशी माझी इच्छा आहे”, असं ते म्हणाले.
गोलंदाज मॅच जिंकवून देत आहेत : या विश्वचषकात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या वेगवानं त्रिकूटानं कहर केलाय. या तिघांनी मिळून आतापर्यंत 54 विकेट आपल्या नावे केल्या आहेत. याबाबत बोलताना सिद्दीकी म्हणाले की, “भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच फलंदाजांची चर्चा होत आली आहे. गोलंदाजांची चर्चा कधी झालीच नाही. मात्र हा पहिला विश्वचषक आहे, जिथं फक्त गोलंदाजांची चर्चा होतेय. गोलंदाज टीम इंडियाला मॅच जिंकवून देत आहेत. फलंदाज धावा करतायेत, मात्र गोलंदाज त्यांना जास्त धावा करण्याची वेळच येऊ देत नाहीत. आतापर्यंत आपल्यावर एकदाही 350 रन्स चेंज करण्याची वेळ आली नाही, कारण आपले गोलंदाज तेवढे रनच बनू देत नाहीत”, असं सिद्दीकी म्हणाले.
मी पाहिलेलं सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण : ते पुढे बोलताना म्हणाले की, “या आधी भारतात जेव्हाही सामने व्हायचे तेव्हा 2 वेगवान गोलंदाज, 3 स्पिनर्स खेळवले जायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता संघात 3 वेगवान गोलंदाज, 2 स्पिनर्स खेळवले जात आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय क्रिकेटसाठी हे चांगले संकेत आहेत. या आधी जेव्हा आपण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत जायचो, तेव्हा सहजतेनं पराभूत व्हायचो. मात्र आता परिस्थिती बदललीये. आता विकेट कशीही असू दे, आपल्याकडं सर्व परिस्थितीत सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे.
सर्व परिस्थितीत सर्वोत्तम गोलंदाजी : भारताची अशी टीम 'मी' आतापर्यंत कधीच पाहिली नाही”, असं त्यांनी शेवटी सांगितलं.ते पुढे बोलताना म्हणाले की, “या आधी भारतात जेव्हाही सामने व्हायचे तेव्हा 2 वेगवान गोलंदाज, 3 स्पिनर्स खेळवले जायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता संघात 3 वेगवान गोलंदाज, 2 स्पिनर्स खेळवले जात आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय क्रिकेटसाठी हे चांगले संकेत आहेत. या आधी जेव्हा आपण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत जायचो, तेव्हा सहजतेनं पराभूत व्हायचो. मात्र आता परिस्थिती बदललीये. आता विकेट कशीही असू दे, आपल्याकडं सर्व परिस्थितीत सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. भारताची अशी टीम 'मी' आतापर्यंत कधीच पाहिली नाही”, असं त्यांनी शेवटी सांगितलं.
हेही वाचा -
- Cricket World Cup 2023 AUS vs SA Semifinal : ऑस्ट्रलिया की दक्षिण आफ्रिका? दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोलकाताच्या 'ईडन'वर कोणाचं 'दिल' होणार 'गार्डन'
- IND vs NZ Semifinal Records : वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं 'बुलेट ट्रेन'च्या वेगानं मोडले 'हे' विक्रम, आता वर्ल्ड कप राहणार लक्ष्य
- Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं न्यूझीलंडला लोळवलं, शमीच्या भेदक माऱ्यासमोर किवीजची शरणागती; अंतिम फेरीत धडक