चेन्नई World Cup 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विश्वचषकातील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यासाठी खूप उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियानं पाच वेळा विश्वचषक जिंकलाय, तर भारतानं देखील दोनदा (1983, 2011) विश्वविजेते पदावर आपलं नाव कोरलंय. यावेळीही भारत तिसऱ्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी जिंकेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलिया संघ प्रभावी : ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यात आतापर्यंत 149 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानं 83 वेळा, तर भारतानं 56 वेळा विजय मिळवला आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत आहे. कारण त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. गेल्या पाच विश्वचषक सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास ऑस्ट्रेलियानं भारतावर 3-2 अशी आघाडी आहे. भारतानं मागील पाच विश्वचषक एकदिवसीय सामन्यांपैकी दोन गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियानं फक्त एक सामना गमावला आहे.
ऑस्ट्रेलियाचा 2-1 नं पराभव : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकासाठी उत्सुक आहे. भारतीय संघानं विक्रमी आठव्यांदा आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 नं पराभव केला आहे. दरम्यान, पावसामुळं त्यांचे दोन्ही सराव सामने रद्द झाले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानविरुद्ध त्यांचा दुसरा सराव सामना जिंकला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळं त्यांचा नेदरलँड्सविरुद्धचा सामना मध्यंतरी रद्द करण्यात आला होता. भारताकडून पराभूत होण्यापूर्वी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची मालिका गमावली होती.
खेळपट्टीचा अहवाल : चेपॉकच्या खेळपट्टीचा आढावा घेतला असता, भारतीय संघाला या खेळपट्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे. चेन्नईतील गेल्या आठ एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या डावातील धावसंख्या 227 ते 299 आहे. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं सहा वेळा विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात फलंदाजी, तसंच गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
हवामान : ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील सामन्यात पावसाची 20 टक्के शक्यता आहे. काही प्रमाणात आकाशात ढग असले तरी AccuWeather च्या अंदाजानुसार आर्द्रता 78% पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तापमानाबद्दल बोलायचं तर ३३ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी 29 टक्के तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन : इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, ॲलेक्स कॅरी, मार्कस स्टॉइनिस, अॅडम झाम्पा, पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क.
हेही वाचा -
ICC ODI World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा 102 धावानं दणदणीत विजय
Cricket World Cup 2023 : भारतात आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव विश्वचषकासाठी उपयुक्त ठरेल - पॅट कमिन्स