अँटिगा - वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्टॅफनी टेलर हिने पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० सामन्यात हॅट्ट्रीक घेत इतिहास रचला. गोलंदाजीशिवाय तिने फलंदाजीतदेखील योगदान देत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला टी-२० मालिकेत ३-० ने क्लिन स्वीप केलं.
वेस्ट इंडिज महिला क्रिकेट आणि पाकिस्तान महिला क्रिकेट यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पाकची कर्णधार जावेरिया खान हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तिचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगाशी आला. पाकिस्तानचा संघ १९.४ षटकात १०२ धावांवर ऑलआउट झाला. यात आलिया रियाज हिने सर्वाधिक २९ धावांचे योगदान दिले.
स्टॅफनी टेलरने २० षटकात आलिया रियाज, डायना बेग आणि अनम अमीन यांना बाद करत हॅट्ट्रिक साधली. या सामन्यात टेलरने ३.४ षटकात १७ धावा देत ४ गडी बाद केले. टेलर टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेणारी वेस्ट इंडिजची दुसरी खेळाडू ठरली.
स्टॅफनी टेलरने गोलंदाजी सोबत फलंदाजीत देखील आपले योगदान दिले. तिने संघ अडचणीत असताना ४१ चेंडूत ४ चौकारांसह ४३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय कायसा नाइट हिने २७ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेले आव्हान वेस्ट इंडिज संघाने १९.१ षटकात ६ गडी राखून पूर्ण केले.
वेस्ट इंडिजने पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा १० धावांनी पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात विंडिजने ७ धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यातील विजयासह वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर ३-० असे निर्भेळ यश मिळवले. दरम्यान, उभय संघात आता ५ सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - IPL २०२२ Mega Auction : CSK 'या' ४ खेळाडूंना करू शकते रिटेन; सुरेश रैनाचा होणार पत्ता कट?
हेही वाचा - श्रेय्यस अय्यर उर्वरित IPL २०२१ हंगामामध्ये खेळणार, ऋषभ पंतचे कर्णधारपद जाणार?