मेलबर्न - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. साउथम्पटन येथे या सामन्याला १८ जूनपासून सुरूवात होणार आहे. याआधी अनेक दिग्गज खेळाडू अंतिम सामन्यात कोणता संघ विजयी ठरणार याविषयीचा आपला अंदाज व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याची यात भर पडली आहे.
टीम पेन याने ब्रिस्बेन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोण जिंकणार याविषयी भाकित वर्तवलं आहे. पेन याच्या मते, भारतीय संघच अंतिम सामना जिंकेल. पेन म्हणाला, माझा अंदाज आहे की, भारत आरामात सामना जिंकेल. पण त्यांना आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावं लागेल.
न्यूझीलंडच्या संघाने अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरोधात दोन सामन्याची मालिका खेळली. या मालिकेत त्यांनी १-० असा विजय मिळवला. यामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला आहे. याविषयावरुन टीम पेन म्हणाला, न्यूझीलंडचा संघ चांगला आहे. परंतु, इंग्लंडचा संघ सर्वश्रेष्ठ नव्हता. अॅशेज मालिकेत आम्हाला त्यांचा सर्वश्रेष्ठ संघ पाहायला मिळाला होता.
दरम्यान, टीम पेन याने न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघाविरोधात कर्णधारपद भूषवलं आहे. त्याच्या नेतृत्वात २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला होता. तर २०२० मध्ये पेनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव भारताने २-१ ने केला होता.
हेही वाचा - India Vs Sri lanka : टीम इंडियाचा नवा 'गुरू' ठरला, गांगुलींनी दिली स्पष्टोक्ती
हेही वाचा - WTC FINAL : भारतीय संघाचे टेन्शन वाढलं, जाणून घ्या कारण