मुंबई - न्यूझीलंडने साउथम्पटन येथे खेळवण्यात आलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ८ गडी राखून धुव्वा उडवत विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. अनेक चाहते भारतीय संघाला 'चोकर्स' म्हणून संबोधित करत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघाला चोकर्सचा शिक्का बसला होता. तो आता भारतीय संघाच्या माथी आला आहे. आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघ 'चोकर्स' असल्याचेच दिसून येते.
२०१५ एकदिवसीय विश्वकरंडक -
२०१५ सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारताने चांगली सुरूवात केली. पहिल्याच सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव केला. ग्रुप ब मध्ये भारतीय संघाने ६ साखळी सामने जिंकले. त्यानंतर भारताने उपांत्यपूर्व फेरीत बांग्लादेशचा १०९ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. परंतु, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ९५ धावांनी पराभव करत टीम इंडियाला स्पर्धेबाहेर केलं.
२०१६ टी-२० विश्वकरंडक
२०१६ सालच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताने आपला पहिला सामना गमावला. त्यानंतर विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने घौडदौड सुरू केली. भारताला आपल्या ग्रुप स्टेजमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता. भारतासाठी हा सामना करा किंवा मरा या स्थितीतील होता. या सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत भारताची गाठ वेस्ट इंडिजशी झाली. परंतु, वेस्ट इंडिजने भारताचा ७ गडी राखून धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली.
२०१७ चॅम्पियन ट्रॉफी -
भारतीय संघ या स्पर्धेत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीत देखील भारताने बांग्लादेशचा ९ गडी राखून धुव्वा उडवत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. समोर आव्हान होते पाकिस्तानचे. अंतिम सामन्यात पाकिस्तानने ३३८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ १५८ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने हा सामना १८० धावांनी जिंकला. विशेष म्हणजे भारतीय संघ प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वात पहिली आयसीसी स्पर्धेत खेळत होता.
२०१९ एकदिवसीय विश्वकरंडक -
२०१९ सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने साखळी सामन्यात दमदार कामगिरी केली. भारताने ९ पैकी ७ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचे आव्हान होते. तेव्हा भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला आणि स्पर्धेबाहेर गेला.