काबुल - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला युएईत सुरूवात झाली आहे. या सत्रात आतापर्यंत दोन सामने पार पडले आहे. जगभरात ही स्पर्धा पाहिली जाते. यात अनेक स्टार खेळाडू सहभागी होत असतात. पण यंदाच्या आयपीएल 2021 च्या प्रसारणाला अफगाणिस्तानमध्ये नव्याने बनलेल्या तालिबान सरकारने बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने देशात आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया मॅनेजर एम इब्राहिम मोमंद यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
एम. इब्राहिम मोमंद यांनी त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आयपीएलमध्ये इस्लाम विरोधी गोष्टी दाखवल्या जातात. महिला आधुनिक वेशात स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी हजेरी लावतात. तसेच या स्पर्धेत चीयर लिडर्स डान्स करतात. यामुळे या स्पर्धेच्या प्रसारणाला बंदी घालण्यात आली.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर महिलाबाबत कठोर निर्णय घेतले जात आहेत. यात देशात मनोरंजनात्मक साधनावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. तसेच तालिबानने महिलांना खेळ खेळण्यासाठी देखील बंदी घातली आहे.
हेही वाचा - न्यूझीलंड नंतर इंग्लंडचा पाकमध्ये खेळण्यास नकार; रमीज राजा म्हणाले, आम्ही मैदानात बदला घेऊ
हेही वाचा - KKR VS CSK : ..म्हणून मी जल्लोष साजरा करत नाही, वरुण चक्रवर्तीने सांगितलं कारण