रायपूर - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. उपुल थरंगाच्या ५३ आणि तिलकरत्ने दिलशानच्या ४७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंका लेजेंड्सने वेस्ट इंडिज लेजेंड्सला ५ गडी राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकाने १९ षटकांत विजय मिळविला. श्रीलंकेचा हा तीन सामन्यांमधील दुसरा विजय आहे. वेस्ट इंडिजच्या हा तिसरा पराभव आहे.
वेस्ट इंडिजच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिलकरत्ने दिलशान आणि सनथ जयसूर्या यांनी आक्रमक सुरुवात केली. वेस्ट इंडिजचा गोलंदाज सुलेमान बेनने जयसूर्याला पायचित करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर दिलशान आणि उपुल थरंगाने खेळायला सुरुवात केली. दिलशानला त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. सुलेमानला बेनच्या गोंलंदाजीवर तो झेलबाद झाला. दिलशानने ३७ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या.
थरंगाने ठोकले अर्धशतक
उपुल थरंगाने एक बाजू लावून धरली. त्याने ३५ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५३ नाबाद धावा केल्या. चमारा सिल्वाने २२ धावा केल्या. ऑस्टिनने सिल्वाला बाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर, टिनो बेस्टने चिंताका जयसिंगे (७) आणि अजंता मेंडिस (०) यांना बाद केले. रसेल अर्नोल्ड ५ धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून टीनो बेस्ट आणि सुलेमान बेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर ऑस्टिन एक बळी घेता आला.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजच्या डावात ब्रायन लाराने ५३ तर ड्वेन स्मिथने ४७ धावा केल्या. लाराने ८ चौकार तर, स्मिथने ४ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली.
हेही वाचा - WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार