रायपूर - शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये श्रीलंका लेजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लेजेंड्सवर ९ गड्यांनी सरशी साधली. श्रीलंकेच्या विजयात कर्णधार तिलकरत्ने दिलशानने चमकदार कामगिरी केली. त्याने फलंदाजीत नाबाद ५० धावांचे योगदान दिले आणि गोलंदाजीत एक बळी घेतला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, लंकेच्या गोलंदाजांसमोर आफ्रिकेचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. त्यांनी १८.५ षटकांत फक्त ८९ धावा केल्या. सुरुवातीच्या धक्क्यानंतर अँड्र्यू पुटिकने दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पुतिकने ४६ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. श्रीलंकेकडून कुलसेकरा, हेराथ आणि जयसूर्या यांनी प्रत्येकी दोन तर, दिलशान, धमिका आणि मेंडिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
श्रीलंकेने १३.२ षटकात १ गडी गमावत या लक्ष्याचा पाठलाग केला. श्रीलंकेचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. श्रीलंकेकडून दिलशानने ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. तर उपुल थरंगाने नाबाद २७ धावा केल्या. जयसूर्या ८ धावांवर तंबूत परतला. क्रुगेरने आफ्रिकेकडून एकमेव बळी घेतला.