नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने एक इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानची टी-२० लीग पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएलमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बाद करण्याची इच्छा असल्याचे आमिरने सांगितले. राजकारण बाजूला सोडून दोन्ही देशांच्या खेळाडूंना आयपीएल आणि पीएसएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी, असेही आमिरने म्हटले.
आमिर म्हणाला, "आम्ही नेहमीच म्हटले आहे, की क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ, राजकारण बाजूला सारले पाहिजे. मला आव्हान स्वीकारणे आवडते आणि मला (विराट कोहली आणि रोहित शर्मा) यांना बाद करायला आवडेल. आयपीएल असो किंवा पीएसएल, भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी हे फायदेशीर ठरेल. या लीगमध्ये खेळण्यामुळे खेळाडूंना चांगले क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल."
विशेष म्हणजे बीसीसीआयने यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. पाकिस्तानच्या ११ खेळाडूंनी आयपीएलमध्ये सहभाग नोंदवला आहे. यात शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमिरने भारताच्या तीन मोठ्या फलंदाजांना माघारी धाडत आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले होते.
भारत-पाक क्रिकेट संबंध -
आयसीसीच्या सर्व बहु-देशीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध खेळतात. परंतू, २०१२-१३पासून दोन्ही संघांनी एकही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली नाही. २००७-०८मध्ये पाकिस्तानने कसोटी मालिकेसाठी शेवटचा भारत दौरा केला होता.