मुंबई - केन विल्यमसन दुखापतीमुळे सुरूवातीचे काही सामने मुकला होता. याचा फटका सनरायजर्स हैदराबाद संघाला बसला होता. हैदराबाद संघाने सुरूवातीचे तीन सामने गमावले. विल्यमसन संघात परतल्यानंतर बुधवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाब किंग्जचा ९ गडी राखून पराभव करत विजयी लय प्राप्त केली होती. त्यामुळे हैदराबादचा संघाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. परंतु त्यांचा हा आनंद काही तासांपुरताच ठरला. हैदराबादचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे आयपीलमधून बाहेर गेला आहे.
हैदराबादचा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाज टी. नटराजन याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. याची माहिती सूत्रांनी दिली. टी. नटराजन हैदराबाद संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. पण दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांमध्ये तो संघाबाहेर होता.
दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी टी. नटराजन याला आराम दिल्याची माहिती याआधी दिली होती. त्याच्या जागी खलील अहमद याला खेळविण्यात आले होते. पण आता टी. नटराजनला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने तो आयपीएल खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - ICC T20I Rankings : बाबर आझमची क्रमवारी सुधारली, विराट 'या' स्थानावर
हेही वाचा - KKR VS CSK : रसेलला 'या' गोष्टीचा नक्कीच पश्चाताप झाला असेल - गंभीर