दुबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी २ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कस्सून सराव करत आहेत. या दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मोठा धक्का बसला आहे.
आयसीसीने आज बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात केन विल्यमसनला आपले अव्वलस्थान गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथने विल्यमसनचे अव्वलस्थान हिसकावून घेतले आहे. विल्यमसन दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
विल्यमसनला 'या'मुळे बसला धक्का
न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत पहिल्या सामन्यात खेळताना केन विल्यमसनला दुखापत झाली. यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. याचा फटका त्याला क्रमवारीत बसला आहे. क्रमवारीत स्मिथ ८९१ गुणांसह अव्वल, तर विल्यमसन ८८६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली चौथ्या स्थानी सरकला
आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी सरकला आहे. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकले आहे. याशिवाय ऋषभ पंत व रोहित शर्मा प्रत्येकी ७४७ गुणांसह अनुक्रमे सहाव्या व सातव्या क्रमांकावर आहेत. गोलंदाजांमध्ये आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा व आर अश्विन अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
आयसीसी क्रमवारीतील अव्वल १० फलंदाज पुढील प्रमाणे
१) स्टिव्ह स्मिथ
२) केन विल्यमसन
३) मार्नस लाबुशेन
४) विराट कोहली
५) जो रुट
६) ऋषभ पंत
७) रोहित शर्मा
८) हेन्नी निकोल्स
९) डेव्हिड वॉर्नर
१०) बाबर आझम
हेही वाचा - युजवेंद्र चहल घेतोय पत्नी धनश्रींकडून डान्सचे धडे, खास व्हिडीओ शेअर
हेही वाचा - WTC Final : केएल राहुल, मयांक अगरवाल यांना विश्रांती तर या 15 शिलेदारांची निवड