मुंबई - विराट कोहलीने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर, भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. विराटने सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत याची माहिती दिली. या निर्णयानंतर क्रीडा जगतातून विराटचे अभिनंदन करण्यात येत आहे. या दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीने तडकाफडकी हा निर्णय का घेतला याचे कारण सांगितलं आहे.
बीसीसीआयकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून यात सौरव गांगली म्हणतात, विराट कोहलीने हा निर्णय भविष्यातील रोडमॅप लक्षात घेऊन घेतला आहे.
विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील एक संपत्ती राहिला आहे. त्याने शानदार नेतृत्व केलं. तो सर्व प्रकारात सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने कर्णधारपदावरून हटण्याचा निर्णय भविष्यातील रोडमॅप लक्षात घेऊन घेतला आहे. आम्ही टी-20 मध्ये विराट कोहलीला त्याच्या कामगिरीमुळे धन्यवाद देतो. तसेच आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देखील देतो. आम्हाला आशा आहे की, तो भारतासाठी खूप साऱ्या धावा करत राहिल, असे देखील सौरव गांगुली यांनी म्हटलं आहे.
विराट कोहलीने त्याच्या पत्रात काय म्हटलं आहे?
विराट कोहलीने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की, मला फक्त भारतीय संघात खेळण्याचीच नाही तर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो.
स्वत:वर असणारा ताण समजून घेणे गरजेचे आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मी तिन्ही प्रकारात भारतीय संघाने कर्णधारपद सांभाळत आहे. पण आता वाटू लागले आहे की, स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-20 संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळे दिले आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे, असे देखील विराट कोहलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून घेतला आहे. त्याने या संदर्भात पत्राच्या शेवटी म्हटलं की, कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घेतला. मी माझ्या जवळच्या व्यक्ती, प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी या निर्णयावर आलो की, आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेंनंतर मी भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. या निर्णयाबद्दल मी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्यासह निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर
हेही वाचा - रवी शास्त्री, भरत अरूण आणि आर. श्रीधर यांची कोरोनावर मात, तरी देखील त्यांना इंग्लंडमध्ये थांबवलं