मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या साउथम्पटन येथे खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही फिरकीपटूला संधी न देता पाच वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणे पसंत केलं आहे. त्यांच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने नाराजी व्यक्त केली. तसेच त्याने उभय संघातील सामन्याविषयी भाकित वर्तवत न्यूझीलंड संघाला चेतावणी दिली आहे.
शेन वॉर्न याने भारत न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याविषयी ट्विट करत भाकित वर्तवलं आहे. तो त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'न्यूझीलंडचा संघाने अंतिम सामन्यात एकही फिरकीपटूला संघात स्थान दिलं नाही. त्यांच्या या निर्णयावर मी निराश आहे. साउथम्पटनची खेळपट्टी फिरकीसाठी मदतीची ठरेल. याची लक्षण दिसू लागली आहेत. लक्ष्यात ठेवा, जर असं झालं आणि भारताने जर २७५/३०० पेक्षा जास्त धावा केल्यास तर समजा सामना संपला. तेव्हा फक्त पाऊसच वाचवू शकेल.'
भारतीय संघ रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अशा स्टार फिरकीपटूंसह मैदानात उतरला आहे. जर वॉर्नने म्हटल्याप्रमाणे जर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांची प्रभावी ठरली तर भारताला याचा मोठा फायदा होईल आणि किवी संघ बॅकफूटवर जाईल. दरम्यान, विजेतेपदाचा निर्णायक सामना 18 जूनपासून सुरु होणार होता. परंतु साउथम्पटनमध्ये झालेल्या मोठ्या पावसामुळे पहिल्या दिवसांचा खेळ रद्द करण्यात आला. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, आज 98 षटके खेळवली जाणार आहेत. तसेच पावसामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे सामन्यात व्यत्यय आला किंवा सामन्याचा निकाल लागू शकला नाही, तर आयसीसीने २३ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे.
हेही वाचा - महिला क्रिकेट विश्वात १७ वर्षीय शफालीचा खास विक्रम
हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडविरुद्ध विराटने नाणेफेक गमावली तर काय होतं, जाणून घ्या रेकॉर्ड