मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षानंतर दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याला शनिवारी 11 वर्ष पूर्ण झाली. परंतु या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात आताचा कर्णधार रोहित शर्माचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावर आता रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली ( Rohit Sharma's reaction ) आहे. रोहित शर्माच्या मते, जेव्हा त्याला संघात स्थान मिळाले नाही, तेव्हा तो विचारात पडला की, आपण काय चूक केली, ज्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले नाही.
भारतीय संघाने 2 एप्रिल 2011 रोजी श्रीलंकेचा पराभव करून संघाने विश्वविजेते होण्याचा मान मिळविला. तसेच भारतीय संघाने 28 वर्षानंतर दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्या संघात अनेक दिग्गज स्टार होते, तरीही या संघात रोहित शर्माला स्थान मिळवता आले नव्हते. त्यावेळी भारतीय संघात सामील न केल्याबद्दल रोहित शर्माने आता प्रतिक्रिया दिली आहे.
संघात निवड न झाल्याने मोठा धक्का बसला होता - ड्रीम 11 वर भारतीय महिला संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सशी संवाद साधताना रोहित शर्माने सांगितले की, जेव्हा त्याला त्याची निवड न झाल्याची बातमी मिळाली, तेव्हा तो खूप विचारात पडला होता. रोहित शर्मा म्हणाला, हे खूप कठीण आहे. विश्वचषक खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न ( Dream of playing World Cup ) असते आणि त्याला त्याचा भाग व्हायचे असते. याशिवाय खेळाडूलाही संघाच्या यशात हातभार लावायचा असतो. मला अजूनही आठवतं, संघ जाहीर झाला तेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेत होतो आणि मालिका खेळत होतो.
मी केवळ 23, 24 वर्षांचा होतो - रोहित शर्मा पुढे बोलताना म्हणाला, माझ्याजवळ तिथे कोणी नव्हते ज्याच्याशी मी बोलू शकेन. मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो की काय चूक झाली आणि मी काय चांगले करू शकलो असतो. त्यावेळेस मी केवळ 23, 24 वर्षांचा होतो आणि त्यामुळे मला माहित होते की, माझ्यात अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे. मी म्हणालो मला फक्त जोरदार पुनरागमन करायचे आहे. जे घडले ते बदलले जाऊ शकत नाही, परंतु आपण पुढे जाऊ शकता.
हेही वाचा - Orleans Masters Super 100: भारतीय बॅडमिंटनपटू मिथुन ऑर्लिन्स मास्टर्स सुपर 100 च्या अंतिम फेरीत दाखल