चेन्नई - कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा ३८ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर गंभीरने मॉर्गनच्या निर्णयावर टीका केली.
वरुण चक्रवर्थीने त्याच्या पहिल्याच षटकात विराट कोहली व रजत पाटीदार यांना बाद केले. त्यानंतर मॉर्गनने त्याला गोलंदाजी न देता त्याच्याजागेवर शाकिब अल हसनला गोलंदाजीसाठी पाचारण केले. मॉर्गनच्या या निर्णयावर गंभीर खवळला. तो म्हणाला, विराट कोहली याची विकेट नक्कीच होती, यात कोणतीच शंका नाही. पण, अशा प्रकारचे विचित्र नेतृत्व मी आयुष्यात पाहिले नाही. एक गोलंदाज पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतो आणि त्यानंतर त्याला पुढचे षटक टाकायला दिले जात नाही. हे आश्चर्यच आहे.'
फॉर्मात असलेले फलंदाज मैदानावर आहेत, हे तुम्हाला माहित आहे. त्यांना पहिल्या सहा षटकांत कसे बाद करता येईल, याची रणणिती आखायला हवी. वरुण चक्रवर्थीने तिसरी विकेट्स घेतली असती किंवा ग्लेन मॅक्सवेललाच बाद केले असते. तिथेच हा सामना संपला असता. एबी डिव्हिलियर्स होता, हे माहित आहे. परंतु, त्याच्यावरील दडपण अधिक वाढले असते, असेही गंभीर म्हणाला.
भारतीय कर्णधाराकडून ही चूक झाली नाही, याचा आनंद आहे. असं झालं असतं तर अनेकांनी टीकेची तलवार चालवण्यास सुरुवात केली असती. आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात विचित्र नेतृत्व आहे, अशा शब्दात गंभीरने मॉर्गनला फटकारले.
दरम्यान, बंगळुरूची अवस्था २ बाद ९ अशी झाली होती. तेव्हा मॅक्सवेल आणि पडीक्कल यांनी संघाचा डाव सावरला. पडीक्कल बाद झाल्यानंतर डिव्हिलियर्स-मॅक्सवेल जोडीने कोलकाताच्या गोलंदाजांचा येथेच्छ समाचार घेतला. ग्लेन मॅक्सवेल (७८) व डिव्हिलियर्सच्या ( नाबाद ७६) फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाता संघाला १६६ धावांपर्यंत मजल मारता आली आणि कोलकाताचा ३८ धावांनी पराभव झाला.
हेही वाचा - IPL २०२१ : चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IPL २०२१ : पांड्या ब्रदर्सचा स्वॅग, हार्दिक अन् कृणालचा पत्नींसोबत भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ