लंडन - अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थिती पाहता राशिद खान आणि मोहम्मद नबी आयपीएलच्या उर्वरित हंगामात खेळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला असून देशातील परिस्थितीचा या खेळाडूंच्या सहभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशात त्यांचा आयपीएल संघ असलेल्या सनरायझर्स हैदराबादने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाचे सीईओ के. शानमुगम यांनी एएनआयला सांगितलं की, 'आम्ही आयपीएलमधील सहभाग विषयावर राशिद आणि नबी यांच्याशी अद्याप चर्चा केलेली नाही. परंतु ते दोघेही आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित हंगामात खेळतील. आमचा संघ 31 ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होणार आहे.'
राशिद खान आणि मोहम्मद नबी हे दोघेही सध्या इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड' ही क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. ही स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी संपणार आहे. स्पर्धा संपल्यानंतर राशिद आणि नबी घरी परतणार की इंग्लंडमध्येच थांबतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील महिन्यात बीसीसीआयने आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम यूएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यात एकूण 31 सामने होणार आहेत. दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही स्पर्धा अचानक मधूनच स्थगित करण्यात आली होती. आता या उर्वरित हंगामाला 24 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने दिलेल्या माहितीनुसार, राशिद खानला सध्या त्याच्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. कारण, काबूलमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने त्याला कुटुंबाला अद्याप अफगाणिस्तानच्या बाहेर काढता आलेले नाही.
हेही वाचा - WI vs PAK Test : रोमांचक सामना वेस्ट इंडिजने अवघ्या एक विकेटने जिंकला, लक्ष्मणने केलं कौतुक
हेही वाचा - Ind Vs Eng : भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य, शमी-बुमराह जोडीची झुंजार फलंदाजी