लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. उभय संघातील ही मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या काळात पार पडणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधीच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आपल्याच संघाला इशारा दिला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात आली. न्यूझीलंडने या मालिकेत इंग्लंडचा १-०ने पराभव करत मालिका आपल्या नावे केली. इंग्लंडचे स्टार फलंदाज या मालिकेत खेळले नव्हते. हाच धागा धरत मायकल वॉन याने इंग्लंडला इशारा दिला आहे.
वॉन एका क्रीडा माध्यमाशी बोलताना म्हणाला, 'इंग्लंडचा फलंदाजी क्रम कमकुवत आहे. जोस बटलर, बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स जर संघात परतले तर इंग्लंडची बाजू बळकट होईल. पण सद्याचा फलंदाजी क्रम बदलल्याशिवाय आणि चांगल्या गोलंदाजांसमोर मोठी धावसंख्या कशी उभारली जाते, याचा विचार केल्याशिवाय मला नाही वाटत की हे टिकू शकतील. सद्याच्या फलंदाजी क्रमासह भारतीय संघाला पराभूत करणे कठिण होईल. मी याला तोपर्यंत समजू शकत नाही, जोपर्यंत इंग्लंडचा संघ एक किंवा दोन बदल करू शकत नाही.'
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेशिवाय वॉनने अॅशेज मालिकेविषयी देखील भाष्य केलं. तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात देशात जाऊन अॅशेज मालिकेत पराभूत करणे कठीण होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिका पाहता इंग्लंड संघाला काही कठिण निर्णय घ्यावे लागतील.
मला वाटत की, डेव्हिड मलानला तिसऱ्या स्थानावर खेळवलं पाहिजे. तो इतका प्रसिद्ध नाही. परंतु धावा करण्यास त्याने सुरूवात केली तर त्याच्यामुळे खूप फायदा होऊ शकतो. त्याच्याकडे अनुभव आहे तसेच तो मागील वेळा ऑस्ट्रेलियात खेळला देखील आहे, असेही वॉन याने सांगितलं.
हेही वाचा - काइल जेमिसनविषयी सचिन तेंडुलकरचे मोठं भाकित, म्हणाला, हा तर...
हेही वाचा - IND VS SL : मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, पाहा व्हिडीओ