हैदराबाद Jaydev Unadkat : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या लिलावात मंगळवारी सनरायझर्स हैदराबादनं सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला १.६० कोटी रुपयांना खरेदी केलं. टीम इंडियाचा नियमित सदस्य बनण्यासाठी धडपड करणाऱ्या या प्रतिभावान गोलंदाजाच्या कारकिर्दीतील हा एक नवीन टप्पा आहे.
'ईटीव्ही भारत'शी खास बातचित : आयपीएलमध्ये नियमित खेळणाऱ्या डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनं लिलावानंतर 'ईटीव्ही भारत'शी फोनवर खास बातचित केली. "सनरायझर्स हैदराबादनं माझी निवड केल्याचा मला खूप आनंद आहे. हा लिलाव आमच्यासाठी (एक संघ म्हणून) चांगला होता. लिलाव माझ्यासाठी एक वेगळा पैलू आहे. माझ्या कारकिर्दीतील हा एक नवीन टप्पा आहे, असं उनाडकटनं सांगितलं.
पॅट कमिन्ससोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यास उत्सुक : उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियम हे आता उनाडकटचं नवं 'होम ग्राऊंड' असेल. सनरायझर्स हैदराबादनं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सला २०.५० कोटी रुपयांना खरेदी केलं. भारतासाठी ४ कसोटी आणि ८ एकदिवसीय सामने खेळलेला उनाडकट विश्वचषक विजेत्या कर्णधारासोबत खेळण्यासाठी आणि त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यास उत्सुक आहे. '"मला आशा आहे की आम्ही ट्रॉफी जिंकू," असं ३२ वर्षीय उनाडकट म्हणाला.
उनाडकटचा आयपीएल रेकॉर्ड : देशांतर्गत क्रिकेटमधील मोठं नाव असलेला जयदेव उनाडकट यापूर्वी मुंबई इंडियन्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. त्यानं आयपीएलच्या ९४ सामन्यांमध्ये ८.८५ ची इकॉनॉमी आणि ५/२५ च्या सर्वोत्तम गोलंदाजीसह आतापर्यंत ९१ विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. याशिवाय त्यानं दोन वेळा एका सामन्यात ५ बळी घेतले आहेत.
भारतासाठी केलेली कामगिरी : उनाडकटनं भारतासाठी १० टी २० सामने खेळले असून त्यात त्यानं १४ विकेट्स घेतल्या. त्यानं २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध टी २० मध्ये पदार्पण केलं. तर जुलै २०२३ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.
हे वाचलंत का :