चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 29 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर सनरायझर्स हैदराबाद संघाचे आव्हान होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईचे आता 6 सामन्यात 4 विजयांसह 8 गुण आहेत. दुसरीकडे आजच्या पराभवानंतर हैदराबादची गुणतालिकेत नवव्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचे 6 सामन्यात 2 विजयांसह केवळ 4 गुण आहेत.
डेव्हॉन कॉनवेची शानदार फलंदाजी : चेन्नईकडून सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने धुवांधार फलंदाजी केली. त्याने 57 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 77 धावा केल्या. त्याला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने उत्तम साथ दिली. ऋतुराजने 30 चेंडूत 35 धावा केल्या. मयंक मार्कंडे वगळता हैदराबादचे सर्व गोलंदाज आज निष्प्रभ ठरले. मार्कंडेने 4 षटकांत 23 धावा देऊन 2 बळी घेतले.
जडेजाची घातक गोलंदाजी : हैदराबादकडून अभिषेक शर्माने 26 चेंडूत सर्वाधिक 34 धावांचे योगदान दिले. त्याला जडेजाने अजिंक रहाणेच्या हाती झेलबाद केले. अभिषेक शर्मा व्यतिरिक्त इतर फलंदाज काही प्रभाव पाडू शकले नाही. चेन्नईकडून फिरकीपटू रविंद्र जडेजाने घातक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 22 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11 : हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक ; बदली खेळाडू - टी. नटराजन, विव्रत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, सनवीर सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग 11 : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), महेश तिक्ष्णा, तुषार देशपांडे, आकाश सिंग, मथीशा पाथिराना ; बदली खेळाडू - अंबाती रायुडू, शेख रशीद, एस सेनापती, ड्वेन प्रिटोरियस, आर हंगरगेकर
हे ही वाचा : IPL 2023 : ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत RCB चा दबदबा, पॉइंट्स टेबलमध्ये हा संघ अव्वल स्थानी