चेन्नई - ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल लिलावामध्ये मोठी बोली लागली. १८ फेब्रुवारीला पार पडलेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याच्यावर १४.२५कोटी रुपये खर्च केले. चेन्नईने बोली लावली होती, मात्र, बंगळुरूने सामना जिंकत मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात सामील केले.
बंगळुरूकडे विश्वासार्ह फिनिशरची कमतरता होती. त्यांची फलंदाजी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवर अवलंबून होती. मात्र, आता मॅक्सवेलच्या येण्याने बंगळुरूचा संघ भक्कम झाला आहे. या लिलावानंतर मॅक्सवेलने व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ बंगळुरूने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
हेही वाचा - आजपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा, 'स्टार' खेळाडूंकडे असणार लक्ष
मॅक्सवेल म्हणाला, ''यावर्षी आरसीबीचा भाग झाल्यामुळे मी खूप उत्साहित आहे. हा एक नेत्रदीपक लिलाव होता. लिलाव पाहण्यासाठी मी रात्रभर जागा होतो. संदेशांबद्दल धन्यवाद. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सबरोबर खेळण्यासाठी मी खूप उत्साही आहे. अॅडम झम्पा, केन रिचर्डसन आणि माझा जुना मित्र युजवेंद्र चहल हे माझे काही मित्रही त्या संघात आहेत. आम्ही अखेर मुंबईत एकत्र क्रिकेट खेळलो होतो.'' विशेष म्हणजे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी खेळाडूंच्या लिलावात ३५.०५ कोटी रुपये खर्च केले.
बंगळुरूने लिलावात घेतलेले खेळाडू -
- काईल जेमीसन - १५ कोटी
- ग्लेन मॅक्सवेल - १४.२५ कोटी
- डॅन ख्रिश्चन - ४.८० कोटी
- सचिन बेबी - २० लाख
- मोहम्मद अझरुद्दीन - २० लाख
- सुयश प्रभुदेसाई - २० लाख
- कोना श्रीकर भरत - २० लाख
- रजत पाटीदार - २० लाख