मुंबई - आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी, मायदेशात परतण्यासाठीची व्यवस्था त्यांनी स्वत:च करावी, असे स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली आहे. आयपीएल संपल्यानंतर खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी खास विमानाची व्यवस्था ऑस्ट्रेलिया सरकारने करावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी केली होती. त्यांची मागणी पंतप्रधान मॉरिसन यांनी फेटाळली आहे.
पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले की, 'भारतात आयपीएल स्पर्धेसाठी गेलेले खेळाडू हे खासगी प्रवासाने गेले आहेत. ते देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेलेले नाहीत. ते स्वत:च्या खासगी फ्रँचायझीच्या संसाधनांचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे खेळाडूंनी स्वत:च त्यांची मायदेशात परतण्यासाठीची व्यवस्था करावी.'
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू खेळत आहेत. यात स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स यांच्यासह प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सायमन कॅटिच यांचा समावेश आहे. याशिवाय समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकेल सॉल्टर आणि लिसा स्थळेकर देखील आयपीएलमध्ये समालोचन पथकाचे सदस्य आहेत. काही तासांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू अँड्रयू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांनी आयपीएलमधून माघार घेत ऑस्ट्रेलिया गाठण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भारतात मागील काही दिवसांपासून दिवसागणिक तीन लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवाशी विमानांना बंदी घातली आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : ‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’
हेही वाचा - टी नटराजनच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया, पाहा काय म्हणाला टी-२० स्पेशालिस्ट