मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दारूण पराभव झाला. हा पराभव जिव्हारीला लागलेला असतानाच बंगळुरूला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूचे खेळाडू अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या संदर्भात ट्विट करत माहिती दिली. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली असून ते मायदेशी परतणार आहेत. राहिलेले सामने ते खेळणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांच्यासोबत आहे. त्यांना शक्य ती मदत आम्ही करू.'
बंगळुरूने फिरकीपटू झम्पाला दीड करोड तर रिचर्डसनवर चार करोड रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले होते. दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याची चर्चा आहे.
याआधी दिल्लीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील माघार घेतली आहे. तसेच राजस्थान रॉयल्सचा ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टायने भारतात वाढत असलेल्या कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाच्या सीमा सील करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे माघार घेतली आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात', अश्विनची आयपीएलमधून माघार
हेही वाचा - CSK vs RCB: होय, एकट्या जडेजाने आमचा पराभव केला; विराटची कबुली