दुबई - दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2020 च्या हंगामासारखे प्रदर्शन करत आपली पावले पुढे टाकू इच्छित आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने दिली. दरम्यान, दिल्ली संघाने यूएईमध्ये आयोजित आयपीएल 2020 मध्ये प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली होती. पण त्यांचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला. आयपीएल 2021 चा हंगाम बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मे महिन्यात स्थगित करण्यात आला होता. आता हा उर्वरित हंगाम यूएईत आजपासून खेळवला जात आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वलस्थानी आहे.
अक्षर पटेल म्हणाला की, आयपीएल 2021 चे दुसरे सत्र यूएईत खेळवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा मी मागील कामगिरीविषयी विचार केला. आमच्याकडे त्या हंगामातील खूप साऱ्या आठवणी आहेत. आम्ही पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलो होते. आम्ही ती कामगिरी पुन्हा करण्यासाठी इच्छुक आहोत. आशा आहे की, या सत्राच्या अंतिम फेरीकडे आम्ही एक एक पाऊल टाकू.
इंग्लंडमध्ये नुकतीच कसोटी मालिका पार पडली. या स्पर्धेत अक्षर पटेल भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने ब्रिटन आणि यूएईमधील वातावरणावर देखील प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, दोन्ही ठिकाणच्या वातावरणात खूप फरक आहे. इंग्लंडचे वातावरण थंड होतो तर येथील वातावरण गरम आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.
हेही वाचा - IPL 2021: लसिथ मलिंगाने चार वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्ससोबतचा अनुभव केला शेअर
हेही वाचा - आयपीएल 2021 ला सुरूवात होण्याआधी पाहा रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी