दुबई - ग्लेन मॅक्सवेल (56) आणि कर्णधार विराट कोहली (51) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 165 धावा केल्या आहेत. मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
आरसीबीची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कलला खाते देखील उघडता आले नाही. तो जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्याचा झेल क्विंटन डी कॉकने घेतला. यानंतर श्रीकर भरत आणि कर्णधार विराट कोहली यांनी तिसऱ्या गड्यासाठी 43 चेंडूत 68 धावांची भागिदारी रचली. राहुल चहरने भरतला बाद करत ही भागिदारी फोडली. भरतने 24 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावांचे योगदान दिले.
भरत बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक सुरूवात केली. त्याने विराट कोहलीसोबत चौथ्या गड्यासाठी 43 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. एडम मिल्ने याने विराट कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. विराटने 42 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. विराटचे हे आयपीएलमधील 42वे अर्धशतक आहे.
विराट कोहलीची जागा घेण्यासाठी ए बी डिव्हिलियर्स मैदानात आला. त्याने मॅक्सवेलसोबत 35 धावांची भागिदारी केली. बुमराहने मॅक्सवेलला माघारी धाडलं. मॅक्सवेलने 37 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावांची खेळी साकारली.
एकवेळ आरसीबी मोठी धावसंख्या उभारणास असे वाटत होते. परंतु जसप्रीत बुमराहने मॅक्सवेल आणि त्यानंतर ए बी डिव्हिलियर्स (11) यांना बाद करत मुंबईची सामन्यात शानदार वापसी करून दिली. शाहबाद अहमदने 1 धाव केली. तर डेनियल ख्रिश्चियन (1) आणि कायले जेमिसन 2 धावांवर नाबाद राहिला. बुमराह आणि बोल्ट यांनी अखेरच्या दोन षटकात फक्त 9 धावा दिल्या. जसप्रीत बुमराह सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
हेही वाचा - KKR VS CSK : चुरशीच्या सामन्यात चेन्नईचा केकेआरवर विजय
हेही वाचा - विराट कोहलीचा आणखी एक कारनामा; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय