अबुधाबी - मुंबई इंडियन्सचा संघाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज सूर्यकुमार यादव हे तिघे चार्टर प्लेनने अबुधाबी येथे पोहोचले आहेत. याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली.
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे तिघे 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात भाग घेणार आहेत. हे खेळाडू इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेले होते. तेथून ते अबुधाबीला पोहोचले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने याविषयी सांगितलं की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे तिघे एका खासगी चार्टर प्लेनने अबुधाबीला पोहोचले आहे. त्या तिघांसोबत त्यांचा परिवार देखील होता. आज सकाळी ते अबुधाबीत दाखल झाले. पुढील सहा दिवस ते क्वारंटाईनमध्ये राहतील.
यूएईला निघताना रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना प्रवासाची परवानगी मिळाली. अबुधाबीत दाखल झाल्यानंतर देखील त्या तिघांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. या ते निगेटिव्ह आले असल्याचे देखील मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने सांगितलं.
याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घोषणा केली होती की, कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज रविवारी चार्टर प्लेनने यूएईला पोहोचतील.
हेही वाचा - नीरज चोप्राचे दुसरे स्वप्नही पूर्ण, फोटो शेअर करत दिली माहिती
हेही वाचा - Ind vs Eng : मँचेस्टर कसोटी सामना रिशेड्युल करण्याच्या निर्णयावर सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया