अबुधाबी - पाच वेळची आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2021 मध्ये 34व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 20 षटकात 6 बाद 155 धावा केल्या आहेत. यात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने 55 तर रोहित शर्माने 33 धावांचे योगदान दिले आणि केकेआरला विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य मिळाले. केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी आश्वासक सुरूवात केली. जम बसल्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. पावर प्लेमध्ये या जोडीने बिनबाद 56 धावा धावफलकावर लावल्या. सुनिल नरेनने ही धोकादायक होत असलेली जोडी फोडली. त्याने 10व्या षटकात रोहित शर्माला शुबमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. रोहित शर्माने 30 चेंडूत 4 चौकारासह 33 धावांचे योगदान दिले.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. परंतु त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. कृष्णाने 13व्या षटकात सूर्यकुमार यादवला (5) दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने सेट फलंदाज क्विटन डी कॉकला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. डी कॉकने 42 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारासह 55 धावांची खेळी साकारली. यानंतर आलेल्या इशान किशनने 13 चेंडूत 1 षटकारासह 14 धावा केल्या. त्याची विकेट लॉकी फर्ग्यूसन याने घेतली.
इशान किशन बाद झाल्यानंतर केरॉन पोलार्ड मैदानात आला. त्याने मोठे फटके मारण्यास सुरूवात केली. पण अखेरच्या षटकात तो धावबाद झाला. त्याने 15 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. यानंतर कृणाल पांड्या (12) फर्ग्यूसनचा शिकार ठरला. तेव्हा सौरभ तिवारीने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत मुंबईला 155 धावांपर्यंत मजल मारून दिली. केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर नरेन याने एक गडी टिपला. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा केला. पण त्याला गडी बाद करण्यात यश आले नाही.
हेही वाचा - IPL 2021 : श्रेयस अय्यर टी-20 क्रिकेटमध्ये 4 हजारी मनसबदार
हेही वाचा - MI vs KKR : केकेआरने नाणेफेक जिंकली; मुंबईची प्रथम फलंदाजी