नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सर्व सामने स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयला याबाबत माहिती दिली. आयपीएलच्या काही संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे अलिकडेच समोर आले होते. तसेच देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहताही आयपीएल सामन्यांच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर कोरोनाचे वाढते संकट पाहता आयपीएलचे उर्वरित सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलच्या चाहत्यांचा मात्र या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल स्पर्धा स्थगित करत असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघातील खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा स्थगित करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएलच्या आयोजनावर गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तसेच आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. काही खेळाडूंनी तर आयपीएल मध्यातून सोडून मायदेश गाठलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडू बायो-बबलमध्ये असूनही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परदेशी खेळाडूंमध्ये अस्वस्थता होती. याच पार्श्वभूमीवर परदेशी खेळाडूंमध्ये आयपीएलचे पुढील सामने खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. अखेर आज आणखी दोन संघांचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
हेही वाचा - 'तुमचे हात रक्ताने माखलेले', ऑस्ट्रेलियन समालोचकाची आपल्याच पंतप्रधानांवर सडकून टीका