मुंबई - आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी याला आपल्या संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्रू टायने वैयक्तिक कारणासाठी आयपीएलच्या चौदाव्या हंगामामधून माघार घेतली आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सने टायच्या जागेवर शम्सीला आपल्या ताफ्यात शामिल करून घेतले.
आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सन टी-20 क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज तबरेज शम्सीसोबत करार केला आहे. राजस्थान रॉयल्स संघाने ट्विट करत याची माहिती दिली. अँड्रू टाय आणि जोफ्रा आर्चर वेगवेगळ्या कारणामुळे आयपीएलच्या चौदाव्या हंगामातून बाहेर गेले आहेत. तर बेन स्टोक्स बाबत देखील अद्याप अनिश्चितता आहे. पण बेन स्टोक्स बाबत राजस्थान रॉयल्स लवकरच घोषणा करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा 31 वर्षीय शम्सी स्थानिक क्रिकेटमध्ये टायटन्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो. त्याने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय डेब्यू केला. फिरकीपटू शम्सीने 39 सामन्यात 45 गडी बाद केले आहेत. तर 27 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावे 32 विकेट आहेत. आयपीएल 2016 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून 4 सामने खेळला होता. यात त्याने 3 गडी बाद केले. आता शम्सीला रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतले आहे.
हेही वाचा - ENG vs IND: जेम्स अँडरसनने पुन्हा केली विराट कोहलीची शिकार, सर्वाधिक वेळा केलं बाद
हेही वाचा - ENG vs IND : इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडिया अवघ्या 78 धावांत गारद