नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला आयपीएलच्या या हंगामामध्ये अद्याप सूर गवसलेला नाही. ''गेल्या आठ हंगामापासून संघातील स्थान आणि जबाबदाऱ्यांतील बदलामुळे असे होत आहे. याउलट ऑस्ट्रेलियासाठी खेळताना माझी भूमिका एकदम स्पष्ट असते, त्यामुळे मला अडचणी येत नाहीत'', असे मॅक्सवेलने म्हटले आहे.
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळणारा मॅक्सवेल त्यापूर्वी इंग्लंडचा दौरा करून आला होता. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्याने अॅलेक्स कॅरीच्या सहाय्याने ९० चेंडूत १०८ धावांची महत्त्वपूर्ण खेळीही केली होती. ''आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना मला माझी भूमिका पूर्णपणे माहित असते. माझे सहकारी कसे खेळतात, याचीही कल्पना असते. मात्र, आयपीएलमध्ये तसे होत नाही'', असे मॅक्सवेल म्हणाला.
गेल्या वर्षी मानसिक तणावातून बाहेर पडणाऱ्या मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. आयपीएलमध्ये मात्र, त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. या हंगामात त्याने सात सामन्यांमध्ये १४.५०च्या सरासरीने फक्त ५८ धावा केल्या आहेत. मॅक्सवेलची स्फोटक फलंदाजी लक्षात घेऊन किंग्ज इलेव्हन पंजाबने १०.७५ कोटी रुपयांची बोली लावून त्याला खरेदी केले आहे.
''पंजाबच्या संघात पाचव्या क्रमांकासाठी फलंदाजी करावी लागते. वरच्या आणि खालच्या फळीला मजबूतीने सांधण्याचे काम पाचव्या क्रमांकाचा फलंदाज करत असतो. मात्र, सततचे बदलणारे संघ, खेळाडू यामुळे कामगिरीत सातत्य ठेवणे कठीण जाते. त्यात संघातील खेळाडूही फक्त दोनच महिने सोबत असतात. त्यामुळेही अडचणी येतात'', असे मॅक्सवेलने सांगितले.