दुबई - आयपीएल-२०२० चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आजच्या 'एलिमिनेटर' लढतीत सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात टक्कर होणार आहे. सलग तीन विजयांसह बाद फेरीचे स्थान निश्चित करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचे पारडे जड मानले जात असले तरी विराटच्या भात्यातील फलंदाज गेम चेंजर ठरू शकतात. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून आहे.
हैदराबादच्या संघाने शेवटच्या तीन लढतीत दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि अव्वल स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सलाही पराभूत केले. मुंबईवर तर दहा गडी राखून विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे. हंगामाची संथ सुरुवात करणाऱ्या हैदराबादने अखेरच्या टप्प्यात दिमाखदार कामगिरी करीत तिसऱ्या स्थानावर बाद फेरी गाठली. हैदराबादची सलामी जोडी सातत्याने चांगली कामगिरी करत असून ते अपयशी ठरले तरी अनेकदा मधल्या फळीने डाव निभावून नेला आहे.
दुसऱ्या बाजूला विराट कोहलीच्या आरसीबीवर आज काहीसा दबाव असणार आहे. त्यांना मागील चार सामन्यांमधील पराभव विसरून विश्वासात्मक खेळ करावा लागेल. संघातील जोश फिलिप चांगली सुरुवात करत आहे, मात्र त्याला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. युवा फलंदाज देवदत्त पड्डिकलची कामगिरी चांगली दिसत आहे. विराट कोहली आणि ए. बी. डिव्हिलीयर्स यांच्याकडून लढतीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहेत. या दोघांनी मोठी खेळी केल्यास आरसीबीला विजय मिळवणे जड जाणार नाही.
एक नजर संघांवर
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), अॅरॉन फिंच, देवदत्त पड्डिकल, पार्थिव पटेल, ए. बी. डिव्हिलीयर्स, गुरकीरत सिंग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अॅडम झम्पा, इसुरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
- सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशीद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बावनका संदीप, संजय यादव, फॅबियन अॅलन, पृथ्वी राज यरा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, बसिल थम्पी.