नाटिंघम - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा आज पाचवा आणि अखेरचा दिवस आहे. पण पाऊस सुरू असल्यामुळे सामन्याला सुरूवात होण्यास विलंब होत आहे. चौथ्या दिवसाअखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या आहे. भारताला विजयासाठी आणखी 157 धावांची गरज आहे.
केएल राहुलच्या रुपाने इंग्लंडला पहिले यश मिळाले आहे. चौथ्या दिवसाअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर नाबाद आहेत. दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यावर पकड निर्माण केली आहे. पाऊस थांबला आणि खेळ झाला तर भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने 46 धावांत 4 बळी घेतले. मोहम्मद शमीला 3 आणि शार्दुल ठाकूरला 2 बळी घेता आले. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 278 धावा केल्या. यात केएल राहुलने सर्वाधिक 84 धावांचे योगदान दिले. त्याच्या या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 95 धावांची आघाडी मिळाली.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने शतत झळकावले. त्याने 172 चेंडूत 14 चौकारांसह 109 धावांची खेळी केली. रुट वगळता अन्य इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. पण रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने 303 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने चौथ्या दिवसाअखेर 1 बाद 52 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी आणखी 157 धावांची गरज आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. उभय संघातील पहिला सामना नाटिंघम येथे होत आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 अंतर्गत होत आहे.
हेही वाचा - 'राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले', नीरज चोप्रावरील एका ट्विटने पेटला नवा वाद
हेही वाचा - सुवर्ण पदकानंतर नीरज चोप्राचे पुढील लक्ष्य काय? जाणून घ्या काय म्हणाला गोल्डन बॉय