नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक कसोटी मालिकाविजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत भारतीय क्रिकेट संघाच्या यशावर सर्वजण आनंदी असल्याचे सांगितले. ब्रिस्बेनच्या गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला तीन गडी राखून पराभूत केले. भारताला विजयासाठी ३२८ धावांचे अवघड लक्ष्य होते. मात्र, सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने हे लक्ष्य गाठले.
हेही वाचा - ब्रिस्बेन कसोटीत चमकला पालघरचा शार्दुल ठाकुर, आई-वडिलांनी केले कौतुक
मोदींनी ट्विट करून लिहिले की, ऑस्ट्रेलियामधील भारतीय क्रिकेट संघाच्या यशामुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उर्जा आणि उत्कटता संपूर्ण खेळात दिसून आली. त्यांनी आपला ठाम हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढनिश्चयही दर्शवला. संघाचे अभिनंदन. आपल्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा."
या विजयासह भारताने ४ सामन्यांची कसोटी मालिका २-१ने जिंकल्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कायम राखली आहे. २०१८-१९मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया दौर्यावर ही ट्रॉफी जिंकली होती.