सिडनी - ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियाच्या अ संघाला चांगलेच धारेवर धरले आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात नुकताच दुसरा सराव सामना पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला. भारताने पहिल्या डावात १९४ आणि दुसऱ्या डावात चार बाद ३८६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १०८ धावात गुंडाळत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद ३०७ धावा केल्या.
हेही वाचा - सुरेश रैना इज बॅक!...'या' स्पर्धेत खेळणार असल्याची दिली कबुली
ऑस्ट्रेलियन संघाच्या लढाऊ भूमिकेवर भाष्य करत बॉर्डर म्हणाले, ''ऑस्ट्रेलिया संघाची ही वाईट कामगिरी होती. मी माझ्या शेवटच्या क्रिकेट हंगामात पाहिलेली ही सर्वात सुस्त कामगिरी होती. हा ऑस्ट्रेलियाचा अ संघ आहे. या संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शिवाय, त्यांना आपली छाप पाडायची आहे. मात्र क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि नेतृत्व अशा तिन्ही आघाड्यांवर हा संघ पूर्णपणे ढेपाळला.''
या सामन्यात भारताकडून हनुमा विहारी आणि पंत यांनी नाबाद शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलिया अ संघाकडून बेन मॅकडर्मोट (नाबाद १०७ धावा) आणि जॅक वाइल्डरमुथ (नाबाद १११ धावा) करून परतले. पहिल्या दिवशी दोन्ही संघाच्या २० फलंदाजांना तंबूत परतावे लागले होते.